ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)- वेगळे होऊन देखील पती सतत त्रास देत असल्याने पत्नीने पतीचा खून केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. खून झाल्यानंतर तब्बल बारा दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी महिलेने पतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फेसबुकवर भेटलेल्या प्रियकराची मदत देखील घेतली होती. या उलगड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विजय संजयकुमार पाटणी असे मृत पतीचे नाव असून, पत्नी सारिका विजय पाटणी आणि तिचा प्रियकर सागर मधुकर सावळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय आणि सारिका या दोघांमध्ये पटत नसल्याने त्यांनी चार महिन्यांपूर्वी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान, सारिकाची फेसबुकवरून सागरशी ओळख झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. याबाबत विजयला कळाल्यानंतर तो दारु पिऊन सारिकाला त्रास देऊ लागला. त्याचबरोबर पुन्हा नांदायला येण्याचा आग्रह धरला. त्यामुळे या सर्व त्रासाला सारिका कंटाळली होती. सारिकाने विजयचा कायमचा काटा काढण्याचं ठरवले.त्यासाठी १८ ऑक्टोबरला सारिकाने विजयला सोबत फिरायला जाण्यासाठी गळ घातली. त्याचबरोबर तिने चाकू आणि डोळ्यात मारायला स्प्रे खरेदी केला होता. फिरायला गेल्यावर सारिकाने विजयजवळ दारू पिण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनी सोबत दारू पिली. मात्र विजयला सारिकाने जास्तीची दारू पाजली. त्यानंतर नशेत असलेल्या विजयच्या डोळ्यावर सारिकाने स्प्रे मारत चाकूने त्याच्या पोटात वार केले.यातच विजयचा मृत्यू झाला त्यानंतर सागरच्या मदतीने सारिकाने मृतदेहाची विल्हेवाट लावली.
सारिकाने पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. पोलीसांनी तपास सुरू केला होता. पण चाैकशी दरम्यान पोलिसांना सारिकावर संशय आल्याने तिची चाैकशी केली असता सारिकाने खुनाची कबुली दिली. पोलिसांना पत्नी सारिका आणि तिचा प्रियकर सावरला अटक केली आहे.