मोदींच्या सभेसाठी भाजपाचे शिंदे गटाला गर्दी जमवण्याचे टार्गेट?
शिंदे गटाची भाजपाकडून गळचेपी, शत प्रतिशत भाजपासाठी शिंदे गटाची धावपळ?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ जानेवारीला मुंबईत येणार आहेत. मुंबईत ते विविध विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा मुंबई दौरा होत आहे. त्यामुळे हा दाैरा यशस्वी करण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील भाजपा नेत्यांनी शिंदे गटालाही या कामाला जुंपले असून गर्दी जमवण्याचे फर्मान सोडले आहे.
राज्यात शिंदे गट आणि भाजपाची सत्ता असली तरीही भाजपा कायमच मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसला आहे. भाजपा नेते शिंदे गटाला दुय्यम वागणूक देत आहेत. महत्वाचे म्हणजे भाजपाच्या नेत्यांनी फडणवीसच मुख्यमंत्री म्हणत एकनाथ शिंदेचे नेतृत्व स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यातच आता मोदींच्या सभेसाठी भाजपने शिंदे गटालाही माणसे आणण्याचं टार्गेट दिलं आहे. मोदी बीकेसीत सभा घेणार आहेत यासाठी भाजपाने शिंदे गटाला ५० हजार लोकांची गर्दी जमवण्याचे टार्गेट दिले आहे. पण शिंदे गटाची मुंबईतील ताकत कमी असल्याने शिंदे गटाने ठाणे आणि इतर ठिकाणाहून गर्दी बनवण्याची तयारी सुरु केली आहे.भाजपा स्वतः या सभेसाठी १ लाखाची गर्दी जमवणार आहे. मुंबईत सभेच्या तयारीसाठी घेतलेल्या बैठकीत भाजपाने शिंदे गटाला हे टार्गेट दिले आहे. त्यामुळे शिंदे गटाची चांगलीच गळचेपी होत असल्याचे समोर आले आहे.
मध्यंतरी अमित शहांनी मुंबईत शत प्रतिशत भाजपा अशी घोषणा केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदींची सभा यशस्वी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.मोदी मुंबईत येणार असल्याने स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दावोसचा दौरा रद्द केला आहे. तर, सभेची जबाबदारी आशिष शेलारांकडे देण्यात आली आहे. पण युतीची शाश्वती नसतानाही शिंदे गटाची मात्र फरफट होत आहे.