ठाकरे व फडणवीस यांच्या एकत्र वाटचालीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होणार
ठाकरे फडणवीसांचा शिंदे व महाविकास आघाडीला इशारा, एकत्र येण्याने सत्तेचे गणित जुळणार?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड हा त्यातला सर्वोच्च बिंदू होता. पण आता फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र वाटचालीमुळे शिंदे गट आणि महाविकासआघाडीत चलबिचल सुरु झाली आहे.
राज्याच्या राजकारणात घडलेल्या घटनांमुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध ताणले गेले होते. दोघांनी एकमेकांनावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. मात्र, आज दोघांनी एकत्र एन्ट्री घेतली. यानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. पण फडणवीस आणि ठाकरे एकत्र आल्याने शिंदे गट आणि महाविकास आघाडीत जोरदार चर्चा रंगली आहे. एकंदरीत सध्याचे राजकारण पाहता भाजपाला ठाकरेंची गरज अधोरेखित होते. कारण इंडिया टुडे’ने केलेल्या एका सर्व्हेमध्ये लोकसभा निवडणूक निकालात भाजप-शिंदे गटाला जोरदार धक्का बसेल, अशी शक्यता वर्तवली गेली. महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी ३४ जागांवर मविआचे उमेदवार निवडून येतील, असा अंदाज संबंधित सर्व्हेमधून व्यक्त केला होता. त्यामुळेच ठाकरेंना आपल्या सोबतीला घेतल्याशिवाय महाराष्ट्रात सत्ता मिळणे कठीण असल्याचे भाजपाला जाणवले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाजकेंबद्दल जनतेत सहानुभूती आहे. त्याचा फटका भाजपाला बसु शकतो. त्यामुळे लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घ्या, अशी मागणी प्रदेश भाजपने केली आहे.महाराष्ट्र काबिज करायचा असेल तर शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय ते काम शक्य नाही, असं भाजपच्या एका गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे आज सुधीर मुनगुंटीवार यांनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची हाक दिली आहे. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चने राज्याच्या राजकारणात धुरळा उडाला आहे.
फडणवीस आणि ठाकरे एकत्र दिसल्यामुळे नेमका हा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे की महाविकास आघाडीसाठी आहे, यावरुनही तर्क वितर्क लढवले जात आहेत. भाजपाने शिंदे गटाला ४८ जागा देणार असे म्हटल्यानंतर शिंदे गटाने भाजपावर चांगलेच तोंडसुख घेतले होते. त्यामुळे ठाकरेंशी संवाद साधत शिंदे गटाला सुचक इशारा दिला आहे. तर शिवसेनेने फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेनेने स्थान डळमळीत झाले आहे. त्यामुळे भाजपाशी जवळीक दाखवत महाविकास आघाडीत आपला होल्ड राखून ठेवण्याची उद्धव ठाकरेंची खेळीही आज दिसून आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात आणखी काही घडामोडी घडतात का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.