खासदार राजन विचारे यांच्यासमोर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण
शिंदे-ठाकरे गटातील राड्याचा व्हिडिओ व्हायरल, ठाण्यात तणाव
ठाणे दि १५(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या दोन गटात असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. असाच एक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. या वादात एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ठाकरे गटातील दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
ठाण्यातील किसननगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. त्याचवेळी शेकडो शिंदे गटाचे कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली.त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाच्या मस्के यांनी सांगितले की, ‘शिंदे गटाकडून वाढदिवासाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे तिथे शिंदे गटाचे नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यासह २० ते २५ कार्यकर्ते त्याठिकाणी आले. त्यांनी आमच्या नगरसेवकाला चुकीच्या पद्धतीने जाब विचारला. तसेच आमच्या नगरसेवकाला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा प्रकार घडला आहे.”

मारहाणीचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले आहे. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ठाकरे शिंदे गटात जूनपासून सुरु झालेला संघर्ष अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटाकडून या घटनेचे तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे.