‘ब्राम्हण बुद्धजीवी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री’
सोशल मिडीयावर विधानाची जोरदार चर्चा, विरोधकांचा दावा खरा?
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका वक्तव्याची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे. अमृता फडणवीस यांनी नाशिकमध्ये आयोजित केलेल्या ब्राह्मण समाजाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल गौरवोद्गार काढले.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, “आम्ही ब्राम्हण आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत, त्याचाही आम्हाला गर्व आहे. ब्राह्मण बुद्धिजीवी आहेत, ब्राह्मण लोकांना मार्केटिंग जमत नाही, पण जे काम करत जातो त्यातून आमच्या कामाची प्रचिती येते”, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं. अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मम महासंघ यांच्याशी काही वर्षांपासून माझे बोलणे सुरू आहे. जात, धर्म वेगळा ठेवून महासंघ काम करतं ब्राह्मण महापुरुष होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भरपूर मोठं काम केलं. असे सांगताना “आमच्यात कमी नाहीये, पण आम्ही नाही करत. आमचं तसंच दिसून येतं. तीही आमची महानता आहे. ती तशीच दिसून येते. म्हणुन देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते ही न मागता. त्यांनी कधीही काही मागितलं नाही. पण त्यांची कार्यपद्धती आणि लोकसेवा पाहून मोदींजींनी आणि वरच्यांनी त्यांना बनवलं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
सोशल मिडीयावर अमृता फडणवीस यांच्या आज देवेंद्र फडणवीस सीएम आहेत, न मागता या विधानाची चर्चा होत आहे. कारण महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत, असा दावा विरोधकांकडून सातत्यानं केला जातो. त्यातच आता अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याचे पडसाद कसे उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.