Latest Marathi News
Ganesh J GIF

केस मागे घेत नाही म्हणून जावयाने सासूवर केले चाकूने वार, नायगाव येथील घटना

पुणे प्रतिनिधी – पोटगी व मुलीचा ताबा यासाठी कोर्टात सुरु असलेली केस सासू मागे घेत नाही याचा राग मनात धरून जावयाने सासूवर चाकूने वार केल्याची घटना हवेली तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नायगाव येथे घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. या घटनेत अलका विठ्ठल गवळी (वय 50, रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी रुपाली संग्राम शिंदे (वय 28, सध्या रा. आदर्श कॉलनी, नायगाव, ता. हवेली, मूळ रा. शिंदे वस्ती, रेल्वेलाईन जवळ, मोडनिंब ता. माढा, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संग्राम बळवंत शिंदे (वय-38 रा. शिंदे वस्ती, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) याच्यावर आयपीसी 307, 324, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रुपाली शिंदे या त्यांच्या आई अलका गवळी यांच्यासोबत नायगाव येथे राहतात. रुपाली यांची पोटगी व मुलीचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात केस सुरु आहे. आरोपी संग्राम शिंदे हा बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता नायगाव येथील सासूच्या घरी आला. त्याने रुपाली यांना केस मागे घेण्यास सांगितले. यावर फिर्यादी रुपाली यांनी ‘जे काही होईल ते कोर्टात होईल’ असे सांगितले. यामुळे चिडलेल्या संग्राम याने टिफिनच्या पिशवीतून आणलेला धारदार चाकू बाहेर काढत ‘तुला जीवानीशी सोडणार नाही’ अस म्हणत फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन गेला. त्यावेळी रुपाली यांची आई अलका गवळी मध्ये आल्या. ‘तुझ्यामुळेच सगळे होत आहे, तूच केस मिटवू देत नाही, तुलाच खल्लास करतो’ असे म्हणत संग्राम याने अलका गवळी यांच्या पोटात दोन ते तीन वेळा चाकू भोसकला. तसेच त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार केले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल घोडके करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!