‘उद्धवजी तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का?’
ठाकरे कुटुंबावर टिका करताना 'या' नेत्याची जीभ घसरली, रश्मी ठाकरेंवरही आरोप
रत्नागिरी दि १९ (प्रतिनिधी)- शिवसेनेतील बंडखोरी आणि त्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. पण आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंवरही जिव्हारी लागणारी टिका केली आहे. यामुळे आरोप प्रत्यारोपाची राळ उडणार आहे.
बंडखोर आमदारांच्या मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेतून शिंदे गटावर टीका केली. त्याला उत्तर म्हणून दापोलीत शिंदे गटाकडुन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कदम यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केला कदम म्हणाले,”मी शिवसेनेत ५२ वर्षे काम केले आहे. अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत, अनेकदा जेलमध्ये गेलो आहे. उद्धवजी ही शिवसेना तुम्ही मोठी केलेली नाही. अनेक शिवसैनिकांन खस्ता खाल्ल्यानंतर हा पक्ष मोठा झाला आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का? मग तुम्हाला हे वारंवार का सांगावे लागत आहे. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची फसवणूक केल्याचा आरोपही केला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना एकनाथ शिंदेच्या नावावर सहमती झाली होती. पण रश्मी ठाकरे यांनी आदळआपट केल्यानंतर उद्धव ठाकरे एका रात्रीत मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले.असा दावाही कदम यांनी केला आहे.