Latest Marathi News
Ganesh J GIF

विक्रमवीर विराट कोहलीने मोडला क्रिकेटच्या देवाचा शतकांचा विक्रम

विराट कोहलीने मोडला सचिनचा विश्वविक्रम, सर्वाधिक शतकांसह एकाच सामन्यात विराटचे अनेक विक्रम, तो क्षण ठरला खास

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- क्रिकेटचा देव अशी ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ४९ शतकांचा विक्रम भारताचा नवा विक्रमवीर विराट कोहलीने आज मोडला आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० शतके झळकवणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. या सामन्यात विराट कोहलीने अनेक विक्रम केले आहेत. विशेष म्हणजे विराटने हा विराट विक्रम सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत केला आहे.

विश्वचषकातील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला वनडे शतकांच्या बाबतीत विराटने मागे टाकले आहे. विराट कोहली याने ११३ चेंडूत ११७ धावांची महत्वपूर्ण खेळी या सामन्यात साकारली. हे विराट कोहलीचे ५० वे एकदिवसीय शतक होते. या विक्रमाची संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती. विशेष म्हणजे सचिन स्वतः सामना पाहण्यासाठी वानखेडेच्या स्टॅन्डमध्ये उपस्थित असताना विराटने त्याचा हा विक्रम मोडीत काढला, पण सचिनच्या वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढल्यानंतर विराट सचिनकडे पाहून नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या सामन्यात विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सचिनने २००३च्या वर्ल्डकपमध्ये ६७३ धावा केल्या होत्या. वर्ल्डकप क्रिकेटच्या इतिहासात एका स्पर्धेत कोणत्याही फलंदाजाला इतक्या धावा करता आल्या नव्हत्या. पण विराटने या स्पर्धेत आत्तापर्यंत ७११ धाव्या केल्या आहेत. विराटने फक्त २७९ डावात ५० शतक केली. सचिनला ४९ शतकांंसाठी ४००हून अधिक डाव लागले होते. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने रिकी पॉन्टिंगच्या १३ हजार ७०४ धावांचा विक्रम मागे टाकला. विराटच्या पुढे आता कुमार संगकारा १४ हजार २३२ धावांसह दुसऱ्या तर १८ हजार ४२६ धावांसह सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. विराट व सचिननंतर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने आत्तापर्यंत वनडेत 31 शतके केली आहेत. विशेष म्हणजे सचिनला एकदा तुमचे विक्रम कोण मोडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सचिन तेंडुलकरने विराट कोहली आणि रोहित शर्माचे नाव घेतले होते. आजच्या शतकी खेळीने विराटने सचिनचा अंदाज सार्थ ठरवला आहे.

सर्वाधिक एकदिवसीय शतके
विराट कोहली (भारत) – ५०
सचिन तेंडुलकर (भारत) – ४९
रोहित शर्मा (भारत) – ३१
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – ३०
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – २८

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा
विराट कोहली(२०२३) – ७११ धावा
सचिन तेंडुलकर(२००३) – ६७३ धावा
मॅथ्यू हेडन (२००७) – ६५९ धावा
रोहित शर्मा (२०१९) – ६४८ धावा
डेव्हिड वॉर्नर (२०१९) – ६४७ धावा

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!