एकनाथ शिंदेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत धक्कादायक निकाल
सर्वेक्षणातून धक्कादायक कौल, ठाकरे, फडणवीस की पवार, बघा सर्व्हेचा निकाल
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण सध्या नाट्यमय वळवाणर असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यास राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अजित पवारांचे नाव चर्चेत आले आहे पण एका नव्या सर्वेक्षणानुसार शिंदे नंतर कोण याचे उत्तर मतदारांनी दिले आहे.
अजित पवार पुढचे मुख्यमंत्री होणार असे वातावरणात सगळीकडे तयार केले जात आहे. अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बॅनर झळकावले होते. त्यामुळे अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का? याच प्रश्नाच्या आधारावर सी-व्होटरनं एका प्रसिद्ध मद्यमांसाठी सर्वेक्षण केलं आहे. या प्रश्नावर बोलताना जनतेनं आपलं मत व्यक्त केलं आहे. सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, ३० टक्के लोकांनी सांगितलं की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. तर राज्यातील ३३ टक्के लोकांनी अजित पवारांकडे मुख्यमंत्री होण्याची क्षमता नाही असा काैल दिला आहे. अजित पवार यांच्यात क्षमता आहे की नाही, याबाबत काहीच अंदाज नसल्याचं ३७ टक्के लोकांचं म्हणणं आहे. दुसरीकडे शिंदे यांच्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल असे सर्वेक्षण केले असता शिंदेसाठी धक्का देणारी माहिती समोर आली आहे. व्होटर संस्थेनं केलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यापेक्षा उध्दव ठाकरेंना अधिक पसंती मिळाल्याचं समोर आलं आहे. केलेल्या सर्व्हेत देवेंद्र फडणवीस यांना २६ टक्के,अजित पवारांना ११ टक्के, उद्धव ठाकरेंना २८ टक्के जनतेने पसंती दिली आहे. तर ३५ टक्के लोकांनी माहित नसल्याचं म्हटले आहे. सी-व्होटरनं हे सर्वेक्षण २४ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच मुख्यमंत्री पदाची स्पर्धा असल्याचे पुढे आले आहे. पण या सगळ्यात राष्ट्रवादीतले इच्छुक मात्र किती पिछाडीवर गेलेत?, हे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण नक्की कोणत्या दिशेला जात आहे. याची शाश्वती नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.