बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज
पोलिसांकडुन अश्रुधुराचा वापर, आंदोलकांची प्रकृती ढासळली, लाठीचार्जचा व्हिडिओ समोर
रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिकांचा उद्रेक पाहायला मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन सुरू असलेला वाद चिघळला आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यामुळे बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता राजकारण तापले आहे. बारसू येथे महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्याठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. परंतु पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. लोकांचा जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीचार्जचा वापर केला. पण गर्दीला पांगवण्यासाठी पोलीसांनी अश्रूधुर सोडले, त्यामुळे अनेक आंदोलक बेशुद्ध पडले, यावेळी पोलीसांनी महिला आंदोलकांनाही मारहाण केली आहे. पण यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राजू शेट्टी यांनी लाठीचार्जचा निषेध करत यामध्ये गृहमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालावं. आम्ही बारसूच्या शेतकऱ्यांना एकाकी पडू देणार नाहीत. ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा आहोत. जर वेळ पडली तर मी देखील त्या ठिकाणी जाईल. असा इशारा दिला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे देखील लवकरच बारसुला भेट देणार आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच ७० टक्के शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. एकंदरीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे समोर आले आहे.