या महिला नेत्याने राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला
महिला नेत्याच्या माजी पीएचा आरोप,सरकारकडे संरक्षणाची मागणी
अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)-दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक आरोप सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेत शिंदे यांनी सय्यद यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाऊसाहेब शिंदे म्हणाले की, भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांच्या भेट घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट दीपाली सय्यद यांचा होता. अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद उचकावत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा आधार होता, असा दावा त्यांनी केला आहे. पण तो नेता कोण हे मात्र त्यांनी सांगितले नाही.अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराही दिले होते. ५० लोकांना ५० हजारांचे चेक देण्यात आले होते. हे चेक बनावट असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्ट मधून होणारे व्यवहार सर्व बेकायदेशीर असून त्यांच्याकडे येणारा पैसा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर अद्याप मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत असलेल्या संबंधांचे सर्व पुरावे आपण शासनाला आणि माध्यमांना देऊ, असं शिंदे यांनी सांगितले आहे.दरम्यान मी कोणी मोठी नाही की घोटाळे करु शकेन. मला त्या व्यक्तीवर काही बोलायचं नाही. अशी प्रतिक्रिया सय्यद यांनी दिली आहे.