
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आता या प्रकरणात एक नवीन कायदेशीर वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने निश्चित केलेले दोषारोप रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे.

आरोपींच्या वकिलांचा धक्कादायक आरोप

बीडच्या विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू असताना आरोपींच्या वकिलांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वकिलांनी कोर्टात काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या यामध्ये घटनास्थळाच्या पंचनाम्याचे पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण न्यायालयात दाखवण्यात यावे. पुरावा म्हणून जप्त केलेल्या लॅपटॉपची ‘क्लोन कॉपी’ आरोपींना मिळावी. सरकारी पक्ष केवळ स्वतःच्या फायद्याचा असेल तेवढाच डेटा कोर्टात सादर करत असल्याचा आरोप आरोपींच्या वकिलांनी केला आहे. “मेहरबान न्यायालयाने स्वतः लॅपटॉप कोर्टात उघडून संपूर्ण डेटा तपासावा,” अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

जामिनासाठी आरोपींची धडपड
एकीकडे हायकोर्टात दोषारोप रद्द करण्यासाठी याचिका दाखल झाली असताना, दुसरीकडे जामिनासाठीही प्रयत्न सुरू आहेत
१. विष्णू चाटे: जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव.
२. जयराम चाटे: बीड न्यायालयात जामीन अर्ज दाखल.
३. प्रतीक घुले: जेलमधूनच जामिनासाठी अर्ज सादर केला आहे.
काय होतं नेमकं प्रकरण?
९ डिसेंबर २०२४ रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची टाकळी शिवारात नेऊन निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि त्यांच्या इतर ४ साथीदारांनी हे कृत्य केले होते. विशेष म्हणजे, मारहाण करतानाचे फोटो आरोपींनी मोबाईलमध्ये काढले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यात संतापाची लाट उसळली होती.
पुढील सुनावणी २१ मे रोजी
पोलिसांनी या प्रकरणात तब्बल १८०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. यात हत्येचा कट कसा रचला गेला आणि कोणते तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले, याचा सविस्तर तपशील आहे. हायकोर्ट आता या याचिकेवर काय निर्णय देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ मे २०२६ रोजी होणार आहे.

