हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेप
प्रकाश गोंधळे खूनप्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, पहा प्रकरण
पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुर्ववैमनस्यातून माथाडी कामगार नेते प्रकाश नारायण गोंधळे यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून केल्याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी हा निकाल दिला आहे.
हिंदू राष्ट्रसेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेडगे, राहुल कौले, विकी पाटील, सुरज फडके आणि आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. त्यांना आयपीसी कलम ३०२ तसेच ५०६(२) अंतर्गत २ वर्षे, फौजदारी कलम ७ च्या तरतुदीनुसार ६ महिने आणि प्रत्येक आरोपीला २० हजार रूपये दंड सुनावण्यात आला आहे. दंडाशिवाय आरोपींनी १ लाख ५० हजार रूपये प्रकाश गोंधळे यांच्या परिवाराला द्यावी असे आदेशात सांगण्यात आले आहे. जून २०१३ मध्ये प्रकाश आण्णा गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात त्यांनी दरवाजावर पेट्रोल टाकून दरवाजा जाळण्यात आला होता. घरात जाऊन घराचे नुकसान केले होते. या प्रकरणाची फिर्याद प्रकाश गोंधळे हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. त्या नंतर सतत त्याचा पाठपुरावा घेऊनही आरोपींना अटक करण्यात आली नव्हती.त्यानंतर आरोपींनी ८ जुलै २०१३ ला गोंधळे यांची हत्या केली होती.
खटल्यात विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. खटल्यादरम्यान न्यायाधीशांनी एकुण १९ साक्षीदार तपासले. प्रकाश आण्णा वर केलेला हल्ला हा अतिशय क्रूर आहे व फियार्दी वर सुद्धा हल्ला करण्यात आला आहे, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. तो मान्य करत आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.