मुंबई दि १४ (प्रतिनिधी) – शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राज्यातील मराठा समाजाचे महत्वाचे नेते मानले जाणारे विनायक मेटे यांचा पहाटे अपघातात निधन झाले. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला जात असताना पहाटे त्यांचा अपघात झाला. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात मराठा महासंघापासून केली. पुढे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसंग्राम संघटनांच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी काम केले. शिवस्मारक हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. पण त्यांच्या अकाली जाण्याने मराठा आरक्षण चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
विनायक मेटे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावात झाला. तीन भाऊ आणि एक बहीण अशी त्यांना चार भावंडं होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. दीड एकराच्या शेतातून कुटुंबाचं भागत नव्हतं, म्हणून त्यांचे वडील मजुरी करायचे. आपले माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर मेटे यांनी कामासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला नातेवाईकांकडे राहून त्यांनी मिळेल ते काम केले. जेजे रुग्णलयाच्या भिंती रंगवल्या, पुढे काही वर्ष त्यांनी मुंबईत भाजीपाला देखील विकला. विशेष म्हणजे त्यांची राजकीय सुरुवात ज्या मराठा महासंघापासून झाली त्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयात त्यांनी शिपाई म्हणून देखील काम केले आहे. १९८६ सालापासून त्यांनी महासंघाच्या कामाला सुरुवात केली. पुढे १९९४ साली त्यांची आखिल भारतीय मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली. मेटेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा आणि बीड जिल्ह्यातील चेहरा म्हणून ते पुढे आले. पुढे त्यांचा फायदा होऊ शकतो हे हेरून भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी हेरले आणि युती सरकारच्या काळात १९९६ साली विधानपरिषदेत पाठवत आमदार केले. विनायक मेटे हे सलग पाचवेळा विधानपरिषदेचे आमदार राहिले. १९९६ ते २०२२ असा सलग २५ वर्षांपेक्षा जास्त काळ ते विधान परिषदेचे आमदार राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
या काळात त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत देखील काम केले पण २०१४ नंतर त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली. त्यामुळे त्यांना अरबी समुद्रात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अंमलबजावणी, देखरेख व समन्व्य समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे भूमिपुजनही झाले. मात्र, न्यायीक प्रकरणामुळे शिवस्मारकाची विटही उभारली गेली नाही.
विशेष म्हणजे राज्यामध्ये मोठ सत्तांतर झालं. मात्र एवढी मोठी घडामोड होऊनही विनायक मेटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अचानक मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी फोन आल्याने ते मुंबईकडे निघाले होते.बैठकीची पूर्वनियोजित वेळ बदलली होती अशीही चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली आहे. आता पोलिसांची आठ पथके अपघाताचा तपास करणार आहेत त्यानंतर खरे कारण समोर येणार आहेत.