‘फक्त ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?
बावनकुळेंच्या विधानामुळे युतीत बेबनाव, युतीची जाणीव ठेवा म्हणत शिंदे गटाचा इशारा
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचं विधान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा तो व्हिडीओसुद्धा भाजपकडून तातडीने हटवण्यात आला. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाटांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार केला आहे. त्यामुळे जागावाटपावरुन जोरदार वाद होण्याची शक्यता आहे.
बावनकुळेच्या वक्तव्यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, फक्त ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?, बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या, अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असंही ते म्हणाले आहेत. शिंदे गटाचे शिरसाट यांनी बावनकुळेंवर थेट हल्लाबोल केल्यामुळे भाजप शिंदे गट युती होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर शिंदे गटाला किती जागा अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात भाजप किती जागा देणार या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत. पण सुरुवातच वादाने झाल्याने आगामी काळात आणखी वादाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढणार असून, शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे म्हणत शिंदे गटाला ४८ जागा देणार आहोत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं. या वक्तव्याने वाद झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगेच सारवासारव करावी लागली होती.