मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर संप मागे, पेन्शनसाठी समितीची घोषणा
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची बैठक पार पडली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील सात दिवसांपासून संपामुळे शिक्षण, रुग्णालय, महाविद्यालय, नगर पालिका, जिल्हा परिषद, म्हाडा, तहसील कार्यालय यांसह अनेक सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होते. या बैठकीत जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत तोडगा काढण्यात आला आहे. हा संप मागे घेण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारने जुन्या पेन्शनसंबंधीची भूमिका स्वीकरली असून जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सुकाणू समितीच्या शिष्टमंडळाचे सदस्य विश्वास काटकर यांनी दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे संपकरी कर्मचाऱ्यांना सरकारने पाठवलेल्या नोटीसा मागे घेणार असल्याचं आश्वासनही सरकारने दिले आहे. उद्यापासून कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत.
संपादरम्यान काही सरकारी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि काळे शर्ट घालून आंदोलन केलं. तसेच सरकारने जुनी पेन्शन योजनेबाबत योग्य निर्णय न घेतल्यास या संपाची धार यापुढेही तीव्र करण्यात येण्याचा इशाराही देण्यात आला होता. संप मिटल्याने आता पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत होणार आहेत.