मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर?
भाजपा अजित पवारांच्या जवळीकतेमुळे शिंदे नाराज, शिंदे गट भाजपात धुसफूस
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावरुन आत्ताही पडद्यामागे हालचाली सुरु आहेत. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, त्यांचा या रजांचे असे कोणतेच नियोजन नव्हते. तरी देखील त्यांनी तीन दिवसांची रजा घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यावरुन कुजबूज सुरु झाली आहे.
राज्यात सुरु असलेल्या सत्तापालटच्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या अनऑफिशियल सुटीवर गेल्याची माहिती आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काय येतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असताना राज्यात मुख्यमंत्री बदलाचेही वारे वाहत आहे. त्यातच एकनाथ शिंदे सहकुटुंब त्यांच्या गावी सातारा जिल्ह्यात गेले असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या या अचानक सुटीवर जाण्याच्या चर्चांनी शिंदे गट आणि भाजपमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचेच समोर येत आहे. भाजपने प्लान बी सुरू केल्याच्याही वावड्या उठल्या आहेत. त्यामुळे शिंदे नाराज आहेत. कारण या सुट्टीची कोणालाही कल्पना नव्हती. कारण एकीकडे एकनाथ शिंदे उघडपणे भाजपाची बाजू मांडत असताना भाजप मात्र अजित पवारांशी जवळीक साधत आहे.हे मुख्यमंत्री शिंदे यांना अपेक्षित नव्हते त्यामुळे शिंदे रजेवर गेले आहेत. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी साताऱ्याला जाणार असल्याचे आपल्या स्टाफला सांगितले आहे. मात्र त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर या दौऱ्याबाबतची कोणतीही माहिती नाही.
एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आपल्या गावातील पूजेत सहभागी होतील आणि त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवतील. ते बुधवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाने मात्र नाराजीच्या वृत्ताचा इन्कार केला असुन शिंदे गावातील यात्रामुळे सुट्टीवर असल्याचे सांगितले आहे.