![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
ड्रेनेज कामावरून भाजप आणि बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
भाजपा आमदार प्रशांत बंब माजी आमदार मानेंचे कार्यकर्ते भिडले, हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल
छ.संभाजीनगर दि ११(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लासूर स्टेशन गावात भाजप आमदार प्रशांत बंब आणि बीआरएसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. लासुर स्टेशन येथे ड्रेनेज लाईनच्या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, असा आरोप केल्यानंतर हा राडा झाला. या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
प्रशांत बंब यांच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातील लासूर स्टेशन येथे ड्रेनेज लाईनचे विकास कामे सुरु आहे. दरम्यान या कामात घोटाळा होत असून चुकीच्या पद्धतीने काम करण्यात येत असल्याचा आरोप माजी आमदार आणि बीआरएस पक्षात प्रवेश केलेले संतोष माने यांनी केला. यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी बीआरएस आणि आ. प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाला वेगळे केले. या राड्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात लासुर स्टेशन येथे ड्रेनेज लाईन चे काम सुरू आहे. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून, सत्ताधारी आमदार प्रशांत बंब कुणालाही विश्वासात घेत नाही असा आरोप माने यांनी केला.
वाद वाढत असताना गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी दाखल झाले. दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या झटापटीला पोलिसांनी मध्यस्थी करत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सध्या गावात पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शांतता आहे.