दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर चर्चा सुरु आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. या दरम्यान, भाजप खासदार रवी किशन यांनी वाढत्या लोकसंख्येचा ठपका काँग्रेसवर ठेवला आहे. काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणले असते तर आज मी ४ मुलांचा बाप नसतो, असे अजब वक्तव्य रवी किशन यांनी केले आहे. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रवी किशन यांनी कॉंग्रेस पक्षावर आरोप केला आहे. ते म्हणाले की, “मला चार मुले आहेत, माझा कोणताही दोष नाही. काँग्रेस सरकारने विधेयक आणले असते, कायदा असता तर आम्हाला चार अपत्ये झाली नसती.” रवी किशन यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्यं आहेत. मला चार मुले आहेत. वडील म्हणून त्यांचे संगोपन मला माहीत आहे. माझा संघर्षही त्यांच्या संगोपनातच होता. त्याचबरोबर आधीच्या सरकारने या बाबतीत वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत अधिक दक्ष राहायला हवे होते. काँग्रेसच्या काळात लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे. आता लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केल्याने चार अपत्ये झाल्याचा पश्चाताप होत असल्याचे त्यांनी मान्य केले.
चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आहे. आपल्या देशातील पूर्वीची सरकारे विचारशील असती तर पिढ्याना त्रास झाला नसता. सध्याचे भाजप सरकार केवळ मंदिरेच बांधत नाही तर रस्तेही बांधत आहे. ते म्हणाले की जेव्हा कॉरिडॉर बनवला जात आहे तेव्हा एम्स देखील बांधले जात आहे.असे म्हणत त्यांनी भाजपच्या कामाचे काैतुक केले आहे.