जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाचा दिलासा नाहीच
जितेंद्र आव्हाडांना न्यायालयीन कोठडी, वकीलाचे यासाठी प्रयत्न
ठाणे दि १२(प्रतिनिधी)- ठाण्यात ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माणमंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह ११ जणांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली होती. दरम्यान या अटकेविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

हाॅलीडे न्यायालयात आव्हाडांचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. पोलिसांकडून आव्हाडांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ठाणे न्यायालयाने संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आव्हाड यांच्या वकिलांकडून जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर अजूनही टांगती तलवार असणार आहे. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला होता. तसेच पोलिसांकडून कोर्टाच्या दिशेने येणारे तिन्ही रस्ते बंद करण्यात आले होते.
ठाण्यातील विवियाना मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहामध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू असताना, जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसोबत चित्रपटगृहामध्ये धडक देत, चित्रपटामध्ये चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करत शो बंद पाडला होता. यावेळी एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचा आरोप आव्हाड यांच्यावर आहे.