शिंदे गटाच्या नेत्याकडुन भाजपच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद, शिंदे गट भाजपाची युती तुटणार?
ठाणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट एकत्र
सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन होताना दिसत नाही.
आता तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतः ठाण्यात शिंदे गटाच्या काही माजी नगरसेवकाने भाजपच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे.
सत्तेत आल्यापासुन शिंदे गट आणि भाजपात सतत वाद आणि कुरघोडी होताना दिसत आहेत. त्यातच आता स्थानिक पातळीवर वाद झाला आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले यांच्या जमावाने भाजप ठाणे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत सोशल मिडीयावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या हल्ल्यात प्रशांत जाधव यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या डोक्याला ९ टाके पडले आहेत आणि आता सिव्हिल रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या पक्षातील अंतर्गत झालेला वाद हा बॅनर लावण्याच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडियो देखील समोर आला आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओनुसार संदीप यांनी माजी नगरसेविका नम्रता भोसले यांना पुढे करून हा हल्ला केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची तक्रार जाधव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्याकडे केली आहे. आता वरिष्ठ यावर काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हल्ल्याच्या निमित्ताने ठाण्यातील शिंदे गट आणि भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राज्यातील महापालिका निवडणूका जवळ आलेल्या असताना पदाधिकारी एकत्र लढण्याच्या मनस्थितीत नसल्याने भाजप शिंदे गट एकत्र लढणार की, एकमेकाविरोधात लढणार हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान पोलीस या हल्ल्याचा तपास करत आहेत.