मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधाने, कर्नाटकबरोबरचा सीमावाद आणि राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्दावर महाविकास आघाडीने १७ डिसेंबरला महामोर्चाची हाक दिली होती आहे. अखेरीस या मोर्चाला पोलिसांनी अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे मोर्चाचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाविकास आघाडीकडून मोर्चाच्या परवानगीसाठी अर्ज करूनही पोलीसांनी त्यांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर टिका करत मोर्चा निघणारच अशी भुमिका घेतली होती. आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते भाई जगताप, नरेंद्र राणे आणि पांडुरंग सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्या चर्चेनंतर महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. पण या मोर्च्यावेळी महाविकास आघाडीला अटी आणि शर्ती पाळाव्या लागणार आहेत. जे. जे. रुग्णालयाजवळून हा मोर्चा निघेल व आझाद मैदानात त्याचा समारोप होणार आहे. आझाद मैदानाजवळ नेतेमंडळींची भाषणे होतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे हे उपस्थित राहणार आहेत.महाविकास आघाडीने ठरलेल्या मार्गानुसारच हा मोर्चा काढावा. तो शांततेच्या मार्गाने निघावा. तसेच यावेळी कायदा सुव्यवस्था देखील पालन करण्यात यावं अशी सूचना गृहमंत्री फडणवीस यांनी केली आहे.
या मोर्चासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचं लक्ष ठेवलं आहे. विराट मोर्चा ऐतिहासिक करण्याचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चाला समाजवादी पक्षापासून सीपीआय, मराठा क्रांती ठोक मोर्चा या संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे.