Latest Marathi News
Ganesh J GIF

 ‘शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवा’

सुप्रिया सुळेंची शिंदे गटाच्या आमदारांची थेट या नेत्यांकडे तक्रार

मुंबई दि २४ (प्रतिनिधी)- विधानभवनाच्या पाय-यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली आहे. या घटनेवर टिका करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना धमकावणा-या शिंदे गटाच्या आमदारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ट्विट करत तक्रार केली आहे. यावेळी धमकी देणारे आमदार गोगावले यांचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.

पावसाळी अधिवेशनात शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली. त्यापार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी शहा यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली आहे. ट्विट मध्ये त्या नमूद करतात की, “शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात माविआच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदे गटाच्या आमदारांकडून माविआ आमदारांच्या सुरक्षेला असलेला वाढता धोका पाहून तुमच्या भाजप पक्षासोबत युतीचे सरकार चालवणाऱ्या लोकांच्या या वृत्तीवर कारवाई करावी आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी.महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असभ्य वर्तन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करून परिस्थिती पाहता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवा”.अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून रोज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विधानभवनात शाब्दिक चकमक उडत होती. पण आज शिंदे गटाकडून थेट धक्काबुक्की करण्यात आली.त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी थेट अमित शहांकडे या गोंधळी आमदारांना शिकवण देण्याची मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!