
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना आमदार आणि खासदारांचा पाठिंबा वाढत चालला आहे. शिवसेनेतील अनेक पदाधिकारीही शिंदे गटात गेले आहेत. ठाकरेंनीही पक्ष बांधायला सुरुवात केली असतानाच विदर्भातील एका माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे विदर्भात शिवसेना नावालाच उरली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे नेते विजय वाडकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी ठाकरेंवर जोरदार टिका केली. ते म्हणाले बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली. बाळासाहेबांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून ज्या लोकांसोबत आपण निवडून आलो. त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली, हे सर्व आम्ही बोलू शकतो, सध्या मी सज्जन भाषेत बोलतो आहे. मात्र, यावर मी नक्की बोलणार आहे, असेही शिंदे म्हणाले आहेत.
बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह आमदार संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड यांनी शिंदे गटाला या आधीच पाठिंबा दिला आहे. आता खेडेकर यांच्या प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यामुळे या भागात पक्षाला उभे करण्याचे आव्हान ठाकरेंपुढे असणार आहे.