Latest Marathi News
Ganesh J GIF

विश्वचषक जिंकणारा संघ होणार मालामाल! मिळणार ‘इतके’ कोटी रूपये

तळाशी राहिलेला संघही होणार लखपती, पहा किती मिळणार रक्कम, भारताच्या या दोन खेळाडूंना मिळू शकते हे विशेष बक्षीस

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि आॅस्ट्रेलिया संघात १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथे पार पडणार आहे. यात विजयी होणाऱ्या संघाला घशघशीत रक्कम मिळणार आहे. पण महत्वाचे म्हणजे या विश्वचषकात तळाशी असणाऱ्या संघाला देखील बक्षीस मिळणार आहे.

न्यूझीलंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाचा मुकाबला पाचवेळा वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. टीम इंडिया २००३ वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलिया देखील सहाव्यांदा विजयी होण्यासाठी खेळणार आहे. यावेळी विजयी संघाला मोठी रक्कम मिळणार आहे. आयसीसी विश्वचषक २०२३ च्या विजेत्या संघाला सुमारे ३३ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेत्या संघाला सुमारे १६.६४ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. उपांत्य फेरीतील सामने गमावलेल्या दोन संघांना ६.६५ कोटी रुपये मिळणार आहेत.साखळी फेरीनंतर विश्वचषकातून बाहेर पडलेल्या सहा संघांना प्रत्येक संघाला ८३ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि नेदरलँडला ही रक्कम मिळणार आहे. म्हणजेच या ६ संघांना एकूण ५ कोटी रुपये मिळणार आहेत. साखळी टप्प्यातील प्रत्येक सामना जिंकला तरी संघांसाठी मोठी बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली होती. प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघासाठी ३३ लाख रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला सोनेरी बॅट आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला सुवर्ण चेंडू देण्यात येईल. हा बहुमान विराट कोहली आणि मोहम्मद शामीला मिळण्याची शक्यता आहे. पण शमीला अॅडम झाम्पाचे आव्हान असणार आहे. दरम्यान याआधी २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. यात भारताचा १२५ धावांनी पराभव झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अंतिम सामना पाहाण्यासाठी उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियाचे उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्ससुद्धा अहमदाबादमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील दिग्गजही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अंतिम सामना पाहण्यासाठी उपस्थित राहाण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!