पुण्यात या भागात खंडणीसाठी व्यापाऱ्यावर कोयत्याने हल्ला
खंडणी प्रकारामुळे व्यापारी वर्ग भयभीत,घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
पुणे दि २२(प्रतिनिधी) पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुबाडल्याचे प्रकरण ताजे असतानाच मुंढवा परिसरातील केशवनगर भागात खंडणीच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांवर आणि दुकानदारांवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास केशवनगर भागातील हरिओम ट्रेडिंग कंपनी या दुकानावर हातात कोयता घेऊन दोन अज्ञात तरुणांनी हल्ला चढवला. यावेळी व्यापाऱ्यांकडे खंडणीची मागत ठार मारण्याची धमकी दिली.तसेच हल्लेखोरांनी हातातील कोयत्याने दुकानातील साहित्याची ही नासधूस केली. या घटनेनंतर केशवनगर परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच दहशत पसरली आहे. हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अशाप्रकारे दहशत वाजवणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने केली आहे. पुण्यात वाढलेली गुन्हेगारी पोलीसांची डोकेदुखी ठरत आहे.अशा घटनांमुळे केशवनगर परिसरातील लहान मुले, महिला आणि व्यापारी घाबरून गेले आहेत.

या भागात सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. हल्लेखोर व्यापाऱ्यांना, दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागत आहेत. पैसे न दिल्यास दहशत माजवणे, दुकानाची तोडफोड करणे असे प्रकार वारंवार होत आहेत.