काॅपीवरून पालक आणि शिक्षकात जोरदार हाणामारी
खळबळजनक घटनेचा व्हिडिओ व्हायरल,मंडळाचा भोंगळ कारभार समोर
छत्रपती संभाजीनगर दि ६ (प्रतिनिधी)- राज्यात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत पण त्याचवेळी गणित पेपरफुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यंदा राज्यात परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. अशात आता कॉपीची आणखी एक घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. मुलांना कॉपी देण्यासाठी आतमध्ये सोडत नसल्याने हा वाद झाला. त्यावेळी पालक आणि शिक्षकांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. इतर पालकांना सोडलं मग आम्हाला का नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला, तर शिक्षकांनीही काॅपी देण्यासाठी कोणाला आत सोडले असा सवाल विचारला. त्यावेळी पालक आणि शिक्षक यांच्यात धक्काबुक्की देखील झाली. अखेर पोलीसांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवला. वाद शांत झाल्यावर परीक्षा पुन्हा सुरळीत सुरू झाली. पण या धक्कादायक प्रकारानंतर उघडपणे कॉपी सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या भांडणामुळे वर्गात बसलेल्या मुलांना देखील पेपर लिहीताना अडचणी आल्या.
राज्यात कॉपी मुक्त परीक्षेसठी मोठी सक्ती केली जात आहे. अशातच कॉपीवरून छत्रपती संभाजी नगरमध्ये पालक आणि शिक्षकामध्ये वाद झाल्याने बारावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्याऐवजी कॉपीयुक्त होतअसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे.