त्या आल्या त्यांनी पाहिलं आणि त्यांनी डाव साधला
इंदापूर बस स्थानकात नक्की काय घडलं, सीसीटीव्ही व्हायरल
इंदापूर दि १(प्रतिनिधी)- दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच दिवाळीनिमित्त बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्याचाच फायदा घेत हे चोरटे हात आपला डाव साधत आहेत. पुण्यातील इंदापूरमध्ये बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलांच्या टोळीने सोन्याचं गंठण चोरी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात बस स्थानकावर शारदा गोपाळ कांबळे ही महिला एसटीमध्ये चढत असताना त्यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या महिलांच्या टोळीने शारदा कांबळे या महिलेचे सोन्याचं गंठण लंपास केले आहे.ही घटना बस स्थानकावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. गंठण लंपास केल्यानंतर महिलाच्या टोळीने तेथून पळ काढला. गर्दीचा फायदा घेत या आरोपी महिलांनी आपला डाव साधल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.

सध्या दिवाळी सण पार पडल्यानंतर सर्वच वाहनांना मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्याचाच फायदा चोरटे घेताना दिसत आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या दोन महिला चोरट्यांवर इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा तपास सुरु आहे. पण प्रवासात नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.