सांगलीत भर पावसात निकृष्ट डांबरीकरण जोरात
पावसात सांगलीत रस्त्याचे डांबरीकरण केल्याचा व्हिडिओ व्हायरल
सांगली दि ७(प्रतिनिधी)- भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा अजब प्रकार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये घडला आहे. मुसळधार पाऊस पडत असतानाही ठेकेदाराकडून रस्त्याचे डांबरीकरण आणि साईड पट्ट्या भरण्याचं काम उरकण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेतवर प्रश्न निर्माण झाला आहे.
इस्लामपूर-ताकारी मार्गावरील राजाराम नगर रस्त्याचं काम सध्या सुरु आहे. अनेक वर्ष हा वर्दळीचा रस्ता असल्याने रस्त्याच्या मोठी दुरावस्था झाली आहे. तर ताकारीकडे जाणारी वाहतूक मोठी आहे. याच रस्त्यावरून ऊसाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते . त्यामुळे अनेक अपघात होत होते. आता या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी रस्त्याच्या साईटपट्ट्या भरण्याचे काम सुरू आहे. रुंदीकरण करताना यांत्रिकीकरणाच्या साह्याने डांबरीकरण सुरु होते. गुरूवारी धुव्वाधार पाऊस पडत असताना रस्ता रुंदीकरणाचे काम थांबवणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराकडून कामगारांना काम सुरुच ठेवा अशा सूचना देण्यात आल्या. त्यामुळे डांबर मिश्रित खडी डंपरने आणून मशिनच्या साह्याने कामगारांनी डांबरीकरण केले आणि साईडपट्टी भरण्याचा कार्यभार मुसळधार पाऊसात उरकण्यात आला.त्यामुळे पावसाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
मुसळधार पावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे या निकृष्ठ कामाचा पंचनामा करुन काम पुन्हा करायला भाग पाडू.तसेच ठेकेदारावर बांधकाम कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा आरपीआयने दिला आहे. या कामामुळे राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे.