ठरल तर! एकनाथ शिंदेंचा या तारखेला पुन्हा एकदा गुवाहाटी दाैरा
शिंदे गटाचे मंत्री आमदारही सोबत, शिंदे समर्थक आमदाराचे मोठे वक्तव्य
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जूनमध्ये म्हणजेच पाच महिन्यांपूर्वी राजकीय भूकंप घडवला होता. त्यावेळी गुवाहाटी नाव चांगलेच चर्चेत आले होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील मंत्री आणि आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी सर्वजण २१ नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत.

जूनमध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावत २५-३० आमदारांसह रातोरात सुरत गाठली. त्या बंडामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास सरकार कोसळले.विधान परिषद निवडणूकीची मतमोजणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गायब झाले होते. नंतर त्या आमदारांचा मुक्काम गुवाहाटीला हलवण्यात आला. शिवसेनेतील ४० बंडखोर आमदार व १० अपक्ष आमदार अशा ५० आमदारांचा गुवाहाटीतील एका आलिशान हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्काम होता. यावेळी त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेत राज्यात सत्तांतर झाल्यास पुन्हा एकदा दर्शनाला येऊ असा नवस केला होता. आता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते दर्शनाला जाणार आहेत यासाठी २१ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.
गुवाहाटी दाै-यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू म्हणाले की, सर्व आमदार जात आहे मी पण जाणार आहे. आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीला नवस केला होता म्हणून सरकार आले.आता कामाख्या देवीला दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे. शेतकऱ्यांचे भलं झालं पाहिजे. सरकार पडलं तरी बेहत्तर पण शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे असं साकडं घालणार असल्याचे कडू यांनी सांगितले. त्यामुळे गुवाहाटी दाै-यानंतर काय घडामोडी घडणार हे पहावे लागेल.