पुणे दि १३(प्रतिनिधी)- पुणे शहरात एक अजब घटना घडल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात एका चोरट्याने चक्क कुत्र्याची चोरी केली आहे. ही सगळी चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी कुत्र्याचे मालक मोजीस डिसूजा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कॅम्प परिसरातून एका भुरट्याच चोराने सायबेरियन हस्की प्रजातीच्या कुत्र्याला पळवून नेले आहे. २८ ऑक्टोबरला मेसी नावाच्या कुत्र्याची चोरी केली आहे. डिसूजा हे सेवानिवृत्त असून कॅम्प परिसरात राहतात. त्यांच्याकडे सायबेरियन हस्की प्रजातीचा कुत्रा आहे ज्याचे नाव त्यांनी “मेस्सी” ठेवले होते. घटनेच्या दिवशी डिसूजा आणि मुलगा क्लिंटन यांनी मेसीला रात्री फिरवून आणल्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर लोखंडी दरवाजाला साखळीने बांधून ठेवले होते. मात्र सकाळी सात वाजता जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मेस्सी तिथे नव्हती. त्यांनी शोधाशोध करूनही ती न सापडल्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही चेक केले असता एकजण मेस्सीला पळवून नेत असल्याचे समोर आले आहे.याचा व्हिडिओही समोर आला आहे.

डिसुझा यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून तक्रार देखील दिली आहे. डिसूजा यांनी दोन वर्षांपूर्वी सायबेरियन हस्की प्रजातीचे श्वान 35000 रुपयांना घेतले होते. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पण या अनोख्या चोरीची जोरदार चर्चा होत आहे.