Latest Marathi News
Ganesh J GIF

मुंबईसाठी खरी लढत उद्धव ठाकरे विरूद्ध भाजपातच ! विजयासाठी ‘ही’ समीकरणे

मनसे बरोबर शिंदे गटाचा फक्त वापर होणार? या लढाईत काँग्रेस राष्ट्रवादी कुठे?

मुंबई दि ११ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीचं सरकार पडले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. पण यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे कमालीची बदलली आहेत. महाविकास आघाडीतून मुंबई महापालिकेची सोपी वाटणारी निवडणूक आता उद्धव ठाकरे यांचा कस पाहणारी ठरणार आहे. तर भाजपाला मुंबई हस्तगत करण्याची संधी दिसू लागल्याने त्यांना आकाश ठेंगणे झाले आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे.

भाजप आणि शिंदे गट यांनी एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. पण ही ताकत मुंबईसाठी पुरेशी नसल्यामुळे नव्या युतीची शक्यता निर्माण झाली आहे. ती युती आहे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या मनसेची. अलीकडे शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांनी गणपती दर्शन करत महाराष्ट्राला नव्या युतीचे दर्शन घडवले आहे. सुरुवातीला मनसे आणि भाजप युतीची शक्यता होती. पण अचानक एकनाथ शिंदे यांची एन्ट्री झाल्यामुळे मनसे मागे पडली असली तरीही पण भाजपाच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्था’च्याही वाऱ्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली ती युतीही होणार हे निश्चित आहे. पण तिचं स्वरुप कसं असणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण या सर्व घडामोडीत तीन दशके सत्ता गाजवणारी शिवसेना नेमकी कुठ आहे. त्यांची रणनिती कशी आहे. यात अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही.

शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला असला तरीही मुंबईतले किती शिवसैनिक शिंदे गटाला साथ देणार आणि किती शिवसैनिक ठाकरेंकडे राहणार याचा नेमका अंदाज अजून कोणालाही नाही. शिवसेनेचा मराठी मतदार या सगळ्या बंड प्रकरणानंतर किती विखुरला आहे आणि शिंदेंच्या बाजूला आला आहे, याचाही नेमका अंदाज नाही. पण शिंदें गट शिवसेनेचा पारंपारिक मतदार आपल्याकडे वळवणार आहे. आणि त्यासाठीच भाजपाला शिंदे गट हवा आहे. शिवाय जर शिवसेनेचे चिन्ह गोठवण्यात आले किंवा न्यायालयाचा निकाल आल्यास आणि तो शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास अनेक समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे भाजपाला मनसेही हवा आहे.

मनसे’मधल्या मोठ्या वर्गाला भाजपासोबत युती करावी असं वाटतं आहे. राज ठाकरेंनीही अनेक भाजपा नेत्यांची बोलणी केली आहेत. पण अधिकृत युती होण्याची घोषणा अजूनही झाली नाही. पण आता जेव्हा शिंदे गटासोबत युती होण्याची चर्चा आहे, मनसे सुरुवातीला जेवढी ताकतीची दिसली होती तेवढी ती आता राहिलेली नाही हे अलीकडच्या निकालावरुन दिसून आले आहे.पण ती आपला ठराविक मतदार राखून आहे.शिवाय मुंबईत मनसेची संघटनात्मक ताकद मोठी आहे. त्यात राज ठाकरेंचा प्रभाव आहेच. त्यामुळे त्यांचा आक्रमक चेहरा शिंदे गटासोबत भाजपाला हवा आहे. राज ठाकरेंनी गेल्या काही वर्षांपासून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते भाजपाच्याही जवळ जाऊ शकले. पण आता शिंदे गटासोबतच्या युतीमुळे, या रणनीतिवर काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. त्याचबरोबर त्यांना सत्तेत किती वाटा भेटणार जागा किती भेटणार या गोष्टीदेखील महत्वाच्या ठरणार आहेत.

दुसरीकडे भाजपाने यंदा मुंबई जिंकायची असा पण केला आहे. अमित शहा यांनी फक्त भाजप म्हणत तो जाहीरही केला आहे. या सगळ्या रचनेत भाजपाचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यांची खरी लढत उद्धव ठाकरेंसोबत असणार आहे. काँग्रेस कमजोर झाल्यानंतर भाजपाकडे गेलेला उत्तर भारतीय मतदार राज ठाकरेंना सोबत घेतल्यास तो मतदार दुरावण्याची भीतीही भाजपाला आहे. त्यामुळे शिंदे आणि मनसेच्या मदतीने मराठी मतांमध्ये हिस्से तयार झाले तर भाजपाला फायदा होऊ शकतो. शिवाय गुजराती समाज हा त्यांचा पारंपारिक मतदार समजला जातो. त्यामुळे त्यांचे मिशन १५० पर्यंत पोहोचण्याचा मार्ग सध्या तरी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात खडतर राहणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची सूत्रं हाती घेतल्यापासून कायम मराठी व्यतिरिक्त अन्य भाषिक मतदारही आपल्याकडे आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ‘मी मुंबईकर’ या कार्यक्रमापासून तो प्रयत्न दिसून येतो.शिवसेनेचा मतदार आता मुंबईत बहुभाषिक झाला आहे. त्यामुळे शिवसेना या मोठ्या बंडानंतरही विजयी होऊ शकते मुंबईत ४० ते ५० अशा जागा आहेत तिथे त्यांना पराभूत करणे शक्य नाही. त्याचबरोबर मुंबईत शिवसेनाच हवी ही मानसिकता अजूनही टिकून आहे. उद्धव ठाकरे आजारी असताना बंड झाल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाटही आहे. शिवसेनेचा मुंबईतला मुळ शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिवसेना आजही मुंबई जिंकण्याचा शर्यतीत आघाडीवर आहे.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे सर्वांनाच ती हवी आहे. खरी लढत उद्धव ठाकरेंची शिवसेना विरूद्ध भाजप अशी असणार आहे. भाजपाला शिंदे गट आणि मनसेच्या साथीने मुंबई जिंकायची आहे तर शिवसेनेचा त्यांच्या शिवसैनिकावर भरवसा आहे. कदाचित त्यांना राष्ट्रवादीचीही साथ लाभण्याची शक्यता आहे. पण या शर्यतीरून काँग्रेस मात्र आधीच आऊट झाली आहे. पण सत्ता कोणाची हे मतदार राजाच ठरवणार आहे

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!