मुंबई दि ३(प्रतिनिधी) – एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. यावर आता २९ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. पण या सत्तासंघर्षात रोज नवे दावे समोर येत असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवाट लावण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आगामी सुनावणीकडे सा-यांचे लक्ष असणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर बोलताना उल्हास बापट म्हणाले की, “जेव्हा शिवसेनेतून पहिले १६ आमदार बाहेर पडले ती वेळ ठरवावी लागेल. शिंदे गटाचे आमदार एकत्र बाहेर पडले की वेगवेगळे या मुद्द्याचा विचार करावा लागेल. सुनावणीअंती शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर त्यांना मंत्रिपदी राहता येणार नाही. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्रीच अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल. त्यामुळे सरकार चालवण्यासाठी ज्याच्याकडे बहुमत आहे, असा नवा मुख्यमंत्री शोधावा लागेल. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे बलाबल पाहता, कोणत्याही पक्षाकडे बहुमत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आगामी सहा महिन्यांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर मध्ये झालेल्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाला त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याची सूचना केली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांनी एकमेकांशी सहमतीने चर्चा करून जे महत्वाचे मुद्दे आहेत ते लिखित स्वरूपात द्यावेत, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. त्यानंतर म्हणजे २९ नोव्हेंबर त्यावर सुनावणी होणार आहे.