शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारची ही बंपर भेट
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर 'या' योजनेची घोषणा
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या आर्थिक वर्षातील २०२३ च्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात येणार आहे.

सध्या देशात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना चार महिन्याला दोन हजार याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात. याच योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री किसान योजना राबवत प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. ही योजना लागू झाल्यास शेतकऱ्यांसाठी शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय ठरेल. ही योजना एप्रिल २०२३ पासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे या योजनेची नियमावली, पात्रतेच्या अटी, आणि अर्थसंकल्पात कितीची तरतूद केली जाणार याबद्दल अजून कोणतीही स्पष्टता नाही. मागील अनेक दिवसांपासून कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा सुरु आहे. त्यानंतर नियम अटी जाहीर केल्या जाणार आहेत.
शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन दोन अडीच महिने झाले आहेत पण या काळात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मतदारांना वळवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.